जन्मशताब्दी
प्रतिष्ठान विषयी
विश्वस्त मंडळ
पुरस्कार
उपक्रम
सह्कार्य
स्पर्धा
साहित्यभूषण परीक्षा
पाथेय त्रैमासिक
कुसुमाग्रज जन्मशताब्दी
(२७ फेब्रु. २०११ ते २६ फेब्रु. २०१२)

कुसुमाग्रज प्रतिष्ठान रौप्य महोत्सवी वर्ष

सन २०१४ - २०१५ हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्या वर्षात तीन मोठे वाड्मयीन..प्रकल्प सुरु करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. ते प्रकल्प पुढीलपुढीलप्रमाणे

kusumagraj

१) 'लोकमाता गोदावरी' प्रकल्प

मानवी सुस्कृती नंद्यांच्या काठी विकसित झालेली आहे. जगातल्या सर्व लहान मोठया नद्यांनी आपापल्या परिसराला विविध प्रकारचे वर प्रदान केलेले आहेत. त्या वरदानामुळे त्या त्या भागातील सुस्कृती समृध्द झाल्याचे आढळते. महाराष्ट्रापुरते पाहिले तर गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरला उगम पावून नाशिक तीर्थक्षेत्रावरून वाहत पूर्ववाहिनी होऊन ती पार आंध्रप्रदेशापलीकडे पोचून राजमहेंद्रीला पूर्व समुद्राला मिळते. गोदावरीच्या महाराष्ट्रातील सुमारे ७०० किलोमीटर्सच्या प्रवाहाने या राज्याला अतिशय समृध्द केलेले आहे. प्रागैतिहासिक काळापासून गोदामातेचे अस्तित्व पुरावारूपाने उपलब्ध आहे. तिचा इतिहास म्हणजे सातवाहन राजवटीचे केंद्र होते. त्या राजवंशाचे मुख्य केंद्र गोदावरीकाळी प्रतिष्ठान उर्फ पैठण हेच होते. मराठी संस्कृतीचा, मराठी भाषेचा विकास गोदावरीकाठी झाला. दंडकारण्यानंतर विकसित झालेली मानवी वसाहत गोदावरीच्या काठाने वाढत होती. प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा प्रदेश आहे.

गोदावरीचे खोरे सह्याद्रीपासून सुरु होते आणि महाराष्ट्राच्या पूर्व सीमेपर्यंत पोहोचते. महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे नदी-खोरे आहे. या खोर्‍याच्या तीन लक्ष बाराहजार चौरस किलोमीटर्सच्या पाणलोट क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील क्षेत्रापैकी ४७% क्षेत्र गोदावरी खोर्‍यामध्ये येते. (संदर्भ- भारतीय सरिता कोश)

गोदावरीच्या काठी प्राचीन काळापासून त्र्यंबकेश्वर-ब्रम्हगिरी, कुशावर्त, नाशिक, रामकुंड, पंचवटी, कोपरगाव, पुणतांबे, पैठण, योगेश्वरी, नांदेड, गुरुद्वारा, यांसारखी तीर्थक्षेत्रे वसली आहेत. गंगापूर, नांदूर मध्यमेश्वर, जायकवाडी, विष्णूपुरी यांसारखे जलप्रकल्प उभारलेले आहेत. श्री च्रक्रधरस्वामीनी गोदावरीकाठी ज्या भागात परिक्रमा केली त्यावरून 'स्थानपोथी' ग्रंथाची निर्मिती झाली. यादव काळातील महानुभाव साहित्यामध्ये श्री चक्रधरांच्या रचनांचा उल्लेख प्रकर्षाने येतो. या साहित्याला गोदावरीचे स्थलमाहात्म्य लाभलेले आहे. गोदावरीकाठी अनेक साधुसंतानी तपाचरण केले.

गोदावरी या महान नदीची प्राचीनता, तिच्या काठावरील तीर्थक्षेत्रे, मंदिरे, मठ, घाट, विद्या, कला, साहित्य, तिच्या काठची ग्रामीण व नागरी संस्कृती (प्राचीन व अर्वाचीन) पिके, फलोद्याने, नवसंपदा, प्राणीजीवन, जीवजैविकता, पर्यावरण व प्रदुषण, लहान मोठे जलप्रकल्प, धरणे, पूर-महापूर या सार्‍यातून उभी राहिलेली संपन्न संस्कृती यांचा साकल्याने व समग्रतेने समावेश असलेला 'लोकमाता गोदावरी' हा ज्ञानकोश-माहितीकोश (गॅझेटीयर नव्हे) सिध्द करणे म्हणजे एक महान सांस्कृतिक कार्य होय. श्री चक्रधरस्वामी म्हणतात -
'उभय गंगातीर, तेही एक खंडमंडल'
तर श्री ज्ञानेश्वर माऊली लिहितात -
ऐसे युगा परी कळी। आणि महाराष्ट्र मंडळी
श्री गोदावरीच्या कुळी । दक्षिणिली ।।
(अ-१८ श्लोक १८०२)

'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' ज्या अर्वाचीन महाकवींच्या नावे स्थापन झाले आहे, त्या कुसुमाग्रजांच्या जीवनातही या गंगामातेला मोठे आदराचे व जिव्हाळयाचे स्थान होते. त्यांनी लिहून ठेवले आहे - 'या गावातील गंगा, देवळे, शाळा-कॉलेजं, संस्था, माणसं, येथील वाड्मयीन, राजकीय, सांस्कृतिक परंपरा या सर्वांनी माझं जगणं घडवलं-' कुसुमाग्रजांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गोदावरी या लोकमातेविषयीचा 'ज्ञानकोश-माहितीकोश', 'लोकमाता गोदावरी' या नावाने प्रतिष्ठानने प्रसिध्द करावा. महाराष्ट्रामध्येच काय, पण भारतामध्येही अशा पवित्र, प्राचीन महानदीचा परिपूर्ण ज्ञानकोश आजवर कोणी सिध्द केलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे महत्व सांस्कृतिकदृष्टया ऐतिहासिक आहे.

२) 'सांस्कृतिक नाशिक' प्रकल्प

नाशिक हे भारतातील एक अतिप्राचीन नगर आहे. या शहराच्या मानवी वस्तीचा शोध घेतल्यास पहिल्या सहस्त्रकांतील पुरावे सापडतात. अशमयुगीन मानवाचे या परिसरात वास्तव्य असल्याचे शोध लागलेले आहेत. (इ.स.२००-शिलालेख) रामायणातील कथेप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक-कान कापले त्यावरून नासिक किंवा नऊ टेकडयांचे, नऊ शिखरांचे (नवटेकावर) म्हणून नासिक हे नाव प्रस्थापित झाले असावे. या प्राचीन नगरीला मुसलमान कारकिर्दीमध्ये गुलशनाबाद (गुलाबांचे शहर) नाव होते. पद्मनगर, त्रिकंटक, जनस्थान ही नावे सुध्दा नाशिकसाठी प्रदान झालेली आहेत. हे शहर तीर्थक्षेत्रे, मंदिरे, घाट, सिंहस्थ कुंभमेळा, तपोभूमी, बौध्दगुंफा, लेणी या धार्मिक प्रयोजनांसाठी जसे प्राचीन काळापासून प्रख्यात आहे, तसेच अर्वाचीन काळातील कृषि-उद्योग-शिक्षण-साहित्य-संगीत-नाटक-सिनेमा, विविध ललित कला, पत्रकारिता, गृहरचना (सिडको), उद्योगधंदे (एमआयडीसी), वाहतूक, देवळाली काँटोन्मेंट, सरकारी टांकसाळ यासारख्या आधुनिक पध्दतीने मानवी संस्कृती उन्नत करणार्‍या अनेक गोष्टींमुळेही प्रसिध्दीला आलेले आहे. या शहरात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्य करणार्‍या अनेक नामांकित संस्था आहेत. महनीय व्यक्तिमत्वे होती व आहेत. व्याख्यानमाला, ग्रंथालये आहेत. साहित्यक्षेत्रापुरता उल्लेख करावयाचा झाल्यास 'कथाकल्पतरू'चा रचनाकार कृष्ण याज्ञवल्की, कवी रंगनाथ, मध्वमुनी, अमृतराय यांपासून रेव्हरंड टिळक, लक्ष्मीबाई टिळक, बालकवी पंडित गणेशशास्त्री लेले, रेव्ह भास्करराव उजगरे, देवदत्त टिळक, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, संपादक द.शं. पोतनीस व अन्य. तसेच त्यानंतरचे बाबुराव बागुल, नारायण सुर्वे, डॉ. अ. वा. वर्टी, मनोहर शहाणे भावना भार्गवे, डाँ. रमेश व डाँ. मंगला वरखेडकर, अनुराधा औरंगाबादकर, चद्रकांत माहामुनी, डॉ. यशवंत पाठक, मनोहर शहाणे, दत्ता सराफ, किशोर पाठक, उत्तम कांबळे, अपर्णा वेलणकर या अनेकांपर्यंत उल्लेख करता येईल. चित्रपट क्षेत्रात दादासाहेब फाळके, दादासाहेब तोरणे आणि अन्य क्षेत्रातील दिग्गज. भगूर येथे जन्म घेतलेल स्वा. सावरकर, स्वातंत्र्ययुध्दात हुतात्मे झालेले कान्हेरे सारखे वीरपुरुष, अशी असंख्य नावे नाशिकच्या सांस्कृतिक समृध्दतेसाठी आठवतील. काळाराम मंदिरातील अस्पृशय प्रवेश हा महाराष्ट्राच्या पुरोगामी सामाजिक चळवळीतील एक महत्वाचा टप्पा होय. अशा या परंपराशाली, सांस्कृतिकदृष्टया महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच्या विकसनशील नगराचा सर्वकष सास्कृतिक धांडोळ घेणार इतिहासवजा ग्रंथ 'सांस्कृतिक नाशिक' या नावाने प्रतिष्ठानने प्रसिध्द करावा असा प्रस्ताव आहे.

३)'कुसुमाग्रज: व्यक्ती आणि वाड्मय' प्रकल्प

ज्ञानपीठ पुरस्काराने आणि पद्मविभूषण सन्मानाने विभूषित, महाराष्ट्राचे अभिमान वाटावे असेआणि नाशिकरांसाठी निरंतर वंदनीय वाटणारे थोर साहित्यिक व्यक्तिमत्व 'कविवर्य कुसुमाग्रज' यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि साहित्याचा साकल्याने परामर्श घेणारा एक संग्राह्य सचित्र ग्रंथ- जसा आजवर प्रसिध्द झालेला नाही- प्रतिष्ठानने प्रसिध्द करावा, असा प्रस्ताव आहे. कुसुमाग्रजांच्या समग्र अभ्यासासाठी व महाराष्ट्राच्या एक महत्वपूर्ण वाड्:मयीन कालखंडाचे अधोरेलेखन करण्यासाठी दस्तऐवज म्हणून हा संदर्भग्रंथ वाचकांना व अभ्यासकांना संग्राह्य ठरेल. हा ग्रंथ प्रतिष्ठानने प्रकाशित करावा असा प्रस्ताव आहे.

४)रौप्य महोत्सवी वर्षांतील विविध उपक्रम प्रकल्प

२६ मार्च १९९० रोजी स्थापन झालेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला मार्च २०१५ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण होतात. त्या निमित्ताने प्रतिष्ठानतर्फे वर्षभर चालणारे, महाराष्ट्रव्यापी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येतील. साहित्याच्या - विशेषत: कुसुमाग्रजांनी हाताळलेल्या विविध शाखांना यामध्ये प्राधान्य देता येईल. प्रतिष्ठानचा बृहन्महाराष्ट्रामध्ये प्रसार-प्रचार व्हावा व तेथेही प्रतिष्ठानचे कार्य पोचावे हा हेतू आहे. याविषयी अधिक तपशील, यानिमित्ताने स्थापन होणारी खास समिती ठरवू शकेल.


Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By Cyberedge Web Solutions Pvt. Ltd.