गायन स्पर्धा २०१० - अधिक वाचा
केसरीनाथ म्हात्रे संदर्भ ग्रंथालय व बालवाचनालय
१३ नोव्हेंबर १९९३ साली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. राम ताकवले यांच्या हस्ते उदघाटन झाले. श्रीमती सिंधुताई म्हात्रे यांनी कै. केसरीनाथ म्हात्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रु. एक लाख देणगी ग्रंथालयाला दिली आहे. संदर्भ ग्रंथांबरोबर इथे लहान मुलांसाठीसुध्दा पुस्तके आहेत. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेतील दुर्मिळ तसेच आधुनिक ग्रंथही येथे उपलब्ध आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या के.ज.म्हात्रे ग्रंथालयाला शासनाकडून 'ब' दर्जा मिळाला आहे. ग्रंथालयात दुर्मिळ संदर्भग्रंथ, साहित्यभूषण परीक्षेसाठी ग्रंथसंग्रह, ललित पुस्तके इ. २२ हजारांच्यावर ग्रंथ असून १५०० च्यावर सभासद आहेत. तसेच बालवाचकांसाठी मुक्तद्वार विभाग असून त्यांच्या काव्य, निबंध, वक्तृत्व अशा स्पर्धा घेतल्या जातात.
१. नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीमध्ये सापडलेल्यांना रोख पैसे व/वस्तुंच्या रूपात सहाय्य केले जाते.
२. दरवर्षी विविध व सद्य परिस्थितीवरील महत्वाच्या विषयावर कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. त्यासाठी महाराष्ठ्रातील अनेक विद्वानांना बोलाविले जाते. कवि संमेलनेही आयोजित केली जातात.
३. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि १० मार्च हा निर्वाणदिन, ह्या दोन तारखांच्या दरम्यान महाराष्ट्रातील विद्वानांची विविध विषयावरील व्याख्याने, सत्कार्यांचा गौरव, कवी संमेलने, बालकवी संमेलने, नृत्य, नाटयावर आधारित कार्यक्रम, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. म.गांधी जंयतीनिमित्त दरवर्षी नाशिक शहरातील विविध भाषिक विद्यार्थ्यांचा मेळावा भरवला जातो. भूकंवग्रस्त, वादळग्रस्त, युध्द इ. प्रसंगात रोख पैसे व वस्तूंच्या स्वरूपात सहाय्य केले आहे.
बालवाचनालय
साखळी बालवाचनालय ही योजना अतिशय यशस्वीरित्या इथे कार्यरत आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड व पुस्तकाबद्दल प्रेम निर्माण व्हावे या उद्दिष्टाने ही योजना सुरू केली गेली. आज मुलांसाठी दूरदर्शन ही अतिशय चिंतेची बाब पालकांना सतावत आहे. दूरदर्शनवरील पुळचट मालिका व चित्रपट यांचे व्यसनच मुलांमध्ये वाढत आहे. त्यापासून त्यांना पुस्तकाच्या जगात नेण्यासाठी येथे परिकथेपासून संगणकापर्यंत विविध विषयांवर ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. वाचनालय सहज व सुलभ रितीने उपलब्ध व्हावे म्हणून जिथे शक्य असेल त्या त्या ठिकाणी लोकांना वाचनालय काढण्यास उद्दुक्त केले जाते. यासाठी फक्त एक खोली जी आसपासच्या मुलांना सोयीची असेल. प्रतिष्ठानला एक अर्ज करायचा आणि वाचनालयाला कुसुमाग्रज प्रतिष्ठान पुरस्कृत नाव द्यायचे. ग्रंथालय सुरू करण्यासाठी प्रतिष्ठानकडून १०० पुस्तके देणगी म्हणून मिळतील. साख्रळी पध्दतीने हा संच बदलून दिला जाईल व दुसर्या वाचनालयात फिरत राहील. अशा रितीने छोटया स्त्रोतातून विविध विषयांवरील पुस्तके मुलांना वाचयला मिळतील. आजमितीला अशी १० ग्रंथालये नाशिक शहरात यशस्वीरित्या चालत आहेत.
आदिवासी कार्य समिती
नाशिक जिल्ह्यात ५० टक्के आदिवासी राहतात. फार थोडी गावं शहरास जोडून आहेत. बाकी बहुतेक भाग आर्थिक व सांस्कृतिक दृष्टीने मागासलेला आहे. आधुनिक प्रगतीपासून खूप
दूर असलेले हे आदिवासी अत्यंत हलाखीचे दिवस कंठत आहेत. त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आदिवासी कार्य समिती नावाची एक समिती नेमण्यात आली आहे. ह्या चळवळी अंतर्गत नाशिक व पेठ तालुक्यातील चार गावांचे पुर्नवसनाचे काम हाती घेतले आहे. यामध्ये आरोग्यसेवा देणे, बालमृत्यू टाळणे, संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधके देणे, गंभीर आजारासाठी सहाय्य करणे, कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे घेणे, आयुर्वद-होमिओपॅथी यांचाही प्रचार करणे, वैद्यकीय पहाणी करणे, सर्वेक्षण करणे, विकासात्मक कामाला चालना देणे, क्रीडास्पर्धा घेणे, वाचनालय उपलब्ध करून देणे, वेगवेगळया विषयांवर भाषण, वादविवाद स्पर्धा, क्रिडा स्पर्धा आणि चांगले चित्रपट दाखवणे इ. महत्वाची कामे 'आदिवासी कार्य समिती' मार्फत सातत्याने सुरू असतात. शिवाय आदिवासी युवक व युवतींची शिबिरे घेतली जातात. निसर्ग औषधींबाबत संशोधन, संगोपन आणि संरक्षण हा प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे. आदिवासी कार्य समिती त्याची माहिती या लोकांना देते व सुविधा त्यांना मिळवून देते.
समितीच्या काही योजना खालीलप्रमाणे आहेत
- कपडे वाटप - नाशिक शहरातील नागरिकांकडून व शाळांकडून कपडे गोळा करून ते गरजू आदिवासींना देण्यात येतात.
- कब्बडी, व्हॉलीबॉल, धावण्याच्या शर्यती, क्रिकेटचा सामना अशा स्पर्धा घेतल्या आहेत.
- तोरंगण येथे जेफोनी ज्यनिअर चेंबरतर्फे दातांचे आरोग्य शिबीर घेण्यात आले, त्यात मोफत तपासणी व औषधे वाटण्यात आली.
- एन. बी. ठाकूर लॉ कॉलेजतर्फे कायदेविषयक माहिती करून देणार्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकांना अपघात नुकसान भरपाई, हुंडाबंदी कायदा, स्त्रीशोषणाविषयीचे कायदे व ग्राहक हक्क कायदे यांची ओळख करून देण्यात आली.
- शिवणकामाचे वर्ग या अंतर्गत स्त्रियांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्यासाठी शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येते.
- बर्याच गावांत पाणी टंचाई आहे. समितीने शासकीय अधिकार्यांच्या मदतीने तोरणगाव येथे बंधारा बांधून घेतला ज्यामुळे आसपासच्या गावांना नळाद्वारे पाणी वाटप करता येईल.
- मलेरियाचे समूळ उच्चाटन १९९५ च्या ऑगस्ट ते ऑक्टोंबर याकाळात महाराष्ट्रात खेडोपाडी मलेरिया पसरला होता. तेव्हा नाशिकजवळील हरसूल या गावी १६०० रोग्यांना औषधोपचार करण्यात आला.
- बालमहोत्सव - तोरंगण - आदिवासी मुलांमध्ये असलेल्या कलेला वाव मिळावा म्हणून प्रतिष्ठानतर्फे तोरंगण येथे या मुलांच्या चित्रकला, रंगकाम, मातीकाम, संगीत, हस्तकला, विज्ञानाचे प्रयोग, समुहगान, अभिनय, अंधश्रध्दा निर्मुलन इ. स्पर्धा घेण्यात आल्या व मुलांनी त्या यशस्वी तर केल्याच पण त्याचा भरपूर आनंद लुटला.
- ह्या लोकांना प्रगत नागरी स्त्रोतात आणण्यात मोठा अडसर म्हणजे रस्ते व वाहतुकीची अडचण. ह्या अडचणींवर मात करण्यासाठी कुठल्याही मदतीशिवाय गणेशगाव ते वेलुंज हा ३ किलोमीटरचा रस्ता तयार केला. अनेक स्वंयसेवकांनी यावेळी आर्थिक व शारीरिक मदत केली.
भारतीय भाषेतील विद्यार्थ्यांचे संमेलन
महात्मा गांधी जयंती निमित्त प्रभातफेरीत शालेय विद्यार्थी सामील झाले. त्यात समुहगान, देशभक्तीपर गाणी, भजन तसेच अभिनय, कथाकथन तेही वेगवेगळया भाषांमधून करण्यात आले. याचे उद्दिष्ट भारतीय एकात्मता रूजवणे हेच होते.
मध्यवर्ती तुरूगांत भाषाभ्यास मंडळ
नाशिक येथील तुरुंगातील कैद्यांना साने गुरूजी कक्षाचे उदघाटन बघण्याचे भाग्य लाभले. प्रतिष्ठानतर्फे वाचनालयासाठी पुस्तके दान करण्यात आली. कैद्यांनी आत्मियतेने भाग घेतला. गाणी म्हटली, कविता ऐकल्या. त्यांचा उत्साह पाहून प्रतिष्ठानने पुढेही असेच साहित्य व संस्कृती संमेलन भरविण्याचे ठरविले आहे.
साहित्य भूषण परीक्षा
मराठी भाषा अभ्यासून प्रोत्साहन देण्यासाठी एम. ए. व एम. फिल दर्जाची एक परीक्षा मे १९९६ पासून प्रतिष्ठानतर्फे घेतली जाते. कोणीही साहित्यप्रेमी ही परीक्षा देऊ शकतो ही वेगळया पध्दतीची परिक्षा आहे. मराठी वाड्मयाचा स्थूल अभ्यास, साहित्यप्रकारांपैकी कथा किंवा कादंबरी, वैचारिक गद्य, ग्रामीण साहित्य किंवा दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य किंवा विज्ञान साहित्य, भाषिक व्यवहार आणि कौशल्ये, दीर्घ निबंध असे विषय असून त्यावर आधारीत पाच प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. प्रत्येक पेपर १०० गुणांचा असतो. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर २५ दिवसात उत्तरपत्रिका घरूनच लिहून पाठवायच्या असतात. मराठी वाड्मयाचा अभ्यास जास्त नीटपणे व्हावा व त्याबरोबर आकलन, अभिव्यक्ती, अविष्कार, ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या ह्या परीक्षेस रूपये १०००/- चा पहिला 'इंद्रायणी' रूपये ७५०/- चा दुसरा 'गोदामाता' आणि रूपये ५००/- चा 'कृष्णामाई' असे तीन पुरस्कार ठेवले आहे.