जन्म पुण्याचा पण कर्मभूमी नाशिक त्यामुळे कुसुमाग्रजांचे नाशिकवर व नाशिककरांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम. नाशिककरांना त्यांच्या या यशाचा गौरव करून आपले प्रेम व्यक्त करावेसे वाटणे अगदी साहजिकच आहे. १९९० मध्ये हे प्रेम 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान'च्या स्वरूपात साकारले.
कुसुमाग्रजांना सामाजिक, आर्थिक व तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून वंचित असलेले गरीब व असहाय्य लोकांबद्दल दया व आदिवासींबद्दल कळवळा होता. त्यांच्या कार्याचा स्त्रोत म्हणजे सुबत्तेकडून गरजूंकडे जाणारा मदतीचा स्त्रोत असे म्हणता येईल. त्यांच्या ह्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठीच कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन झाले. मा. कुसुमाग्रज ह्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या आणि क्षणोक्षणी त्यांचे मार्गदर्शन लाभणार्या प्रतिष्ठानने चांगलेच मार्गक्रमण केले आहे.
२६ मार्च १९९० रोजी अस्तित्वात आलेल्या 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' समोर खालील उद्दिष्टे ठरविण्यात आली
१.
गरीब-श्रीमंत, जात-पात, धर्म इत्यादी भेद ओलांडून सर्व समाज जीवनाची उंची वाढावी ह्या दृष्टीने साहित्य, भाषा, विज्ञान, वैद्यकीय, नाटय, संगीतादी अन्य कला आणि तत्सम सामाजिक कार्यास प्रोत्साहन देणे.
२.
कुसुमाग्रजांच्या विचारांचा आणि त्यांनी आपल्या सर्वकष साहित्यातून मांडलेल्या ध्येय-धोरणांचा पुरस्कार, प्रचार व प्रसार करणे.
३.
कुसुमाग्रजांच्या सर्व साहित्याचे जतन करणे आणि त्याचा प्रसार सर्व माध्यमातून आणि भाषांतून करणे, तसेच काम करणार्या संस्थांना प्रोत्साहन देणे.
४.
वरील उद्दिष्ट पूर्तीसाठी नियमांच्या आधिन राहून देणग्या, निधी, फंड जमा करणे, आजीव सदस्य स्वीकारणे, देणग्या मिळविणे, त्यासाठी आवश्यक त्या सर्व जबाबदार्या स्वीकारणे, कर्तव्य पार पाडणे व त्या अनुषंगाने सर्व प्रयत्न करणे.
प्रतिष्ठानची स्विकृत कार्ये
१.
जनस्थान पुरस्कार - 'ज्ञानपीठाच्या' धर्तीवर केवळ मराठीतील तपस्वी साहित्यिकांसाठी एक लाख रुपयांचा 'जनस्थान पुरस्कार' एक वर्षाआड, २७ फेब्रुवारी रोजी समारंभपूर्वक देणे.
२.
गोदावरी गौरव - साहित्येतर क्षेत्रांसाठी (ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प, नृत्य-संगीत, जनसेवा, नाटयचित्र) समारंभपूर्वक १० मार्च रोजी हा गौरव एक वर्षाआड अखिल भारतीय स्तरावरील त्या त्या सुयाग्य व्यक्ती निवडून त्यांना रू. ११ हजार प्रत्येकी व मानचिन्ह अर्पण करणे.
३.
आदिवासी भागात वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक असे विकासात्मक कार्य करणे.
४.
नाशिक शहरात संदर्भ ग्रंथालय चालविणे.
५.
नाशिक परिक्षेत्रात साखळी बाल-वाचनालये चालविणे.
६.
मराठी भाषा व साहित्याबद्दल आस्था, आवड व अभिरूची निर्माण होण्यासाठी दरवर्षी 'साहित्यभूषण' ह्या उच्चस्तरीय परीक्षेचे आयोजन करणे.
७.
वरील कार्यंपूर्तीच्या संदर्भात सभा-संमेलने, शिबीर, परिसंवाद, शिक्षणवर्ग आयोजित करणे. तसेच हे कार्य करणार्या संस्थांच्या संपर्कात राहणे.
८.
क्रीडेला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी भागात विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे.
९.
ग्रामीण व आदिवासी विभागांसाठी शासनाने निश्चित केलेल्या योजना फलदायी होण्यासाठी प्रयत्न्न करणे.
१०.
वरील कार्यासाठी कोणतीही भौगोलिक वा प्रादेशिक सीमा संस्थेला अभिप्रेत नाही.
Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By CyberEdge Solutions.